निवडणुकांसाठीची वयोमर्यादा भाजपाने केली शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 04:06 AM2018-08-12T04:06:30+5:302018-08-12T04:06:50+5:30
निवडणुकांच्या राजकारणासाठी वयाच्या ७५ वर्षांची मर्यादा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिथिल केल्याने ज्येष्ठ नेत्यांनाही आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकणार आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - निवडणुकांच्या राजकारणासाठी वयाच्या ७५ वर्षांची मर्यादा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिथिल केल्याने ज्येष्ठ नेत्यांनाही आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकणार आहे. या निर्णयाचा लालकृष्ण अडवाणी (९०), मुरली मनोहर जोशी (८४), शांताकुमार (८३) व लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन (७५) यांना लाभ होऊ शकेल. सध्या लोकसभेत १७ भाजपा खासदारांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे.
अमित शहा यांनी म्हटले, निवडणूक लढविण्यासाठी वयाची मर्यादा नाही. ७५ वर्षांची मर्यादा पदासाठी आहे. पदे कोणती याचा खुलासा केला नसला तरी मंत्रिपदे, लवाद, आयोग, बोर्ड या पदांसाठी हा निकष आहे. संसदीय समित्यांची पदे व सभापती इत्यादींसाठी नाही. निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पक्षाने ज्येष्ठांवर सोडला आहे.
एका नेत्याने सांगितले की, काही खासदारांनी पंचाहत्तरी पूर्ण केली असली तरी ते निवडणुका जिंकत आहेत. ते तंदुरुस्त आहेत. शेजारील मतदारसंघावरही त्यांच्या प्रभावाचा परिणाम होऊ शकतो. त्यांचा पक्षाला लाभच होऊ शकतो.
ते म्हणाले, ७५ वर्षांवरील नेत्यांना निवृत्त करण्यावर पक्ष एकेकाळी गंभीर होता. त्यामुळेच कलराज मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नजमा हेपतुल्ला यांनी राज्यपाल बनण्यासाठी राज्यसभा सोडली. तथापि, कलराज मिश्रा यूपीतील भाजपाचा ब्राह्मण चेहरा आहेत. शांताकुमार यांनी हिमाचलमध्ये पक्षाला जिंकण्यासाठी मदत केली. बिहारचे हुकूमदेव नारायण यादव ७८ वर्षांचे असले तरी यादवांचे नेते आहेत. सुमित्रा महाजन इंदूरमधून नऊ वेळा निवडून गेल्या आहेत, तर ७९ वर्षीय करिया मुंडा यांना झारखंडमधील आदिवासींमध्ये मान आहे.