2019च्या लोकसभा निवडणुकीत यूपीतल्या 80 जागा भाजपासाठी निर्णायक, संघाच्या अहवालावर ठरणार रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 10:30 AM2018-12-28T10:30:54+5:302018-12-28T10:35:00+5:30
उत्तर प्रदेशमधल्या लोकसभेच्या 80 जागा या केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावत असतात.
बंगळुरू- उत्तर प्रदेशमधल्या लोकसभेच्या 80 जागा या केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावत असतात. गेल्या वेळी उत्तर प्रदेशमधून भाजपानं 71 खासदार निवडून आणले होते. त्यामुळे त्यांना केंद्रात सत्ता बनवता आलं. त्यामुळे भाजपा आणि संघ परिवार पुन्हा एकदा 2014चा करिश्मा आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भाजपा आणि संघ परिवार लोकसभेच्या सर्व जागांची चाचपणी करत आहे. भाजपाच्या योजनेंतर्गत लोकसभेच्या भागातील नेते आणि कार्यकर्त्यांना लोकांमध्ये कुठल्या मुद्द्यांची जास्त चर्चा आहे, याची माहिती घ्यायला सांगितली आहे.
तसेच ग्राऊंड झिरोचा अहवाल एकत्र करून रणनीती आखण्याचीही भाजपाची योजना आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री गोरधन झडफिया हे नियुक्त रणनीतीचा एक भाग आहेत. भाजपाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येण्याचा आदेशही दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून पक्षातील असंतुष्ट नेत्यांना समजावण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 80 लोकसभेच्या जागा आहेत. 2014ला भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएनं 73 जागांवर विजय मिळवला होता. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या संभाव्य आघाडीनं होणारं नुकसान टाळण्यासाठी भाजपानं चांगलीच कंबर कसली आहे. संघ आणि विहिंप हेसुद्धा राम मंदिराच्या मुद्द्याबरोबरच या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. भाजपानं गेल्या वेळी ज्या 71 जागांवर विजय मिळवला होता. त्या ठिकाणी संघाच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे ते स्वयंसेवक खासदारांची कामगिरी आणि पुन्हा त्या जागेवरून विजय मिळवण्यासाठी गरजेच्या असलेल्या मूलभूत प्रश्नांची माहिती गोळा करत आहेत.
या गोळा केलेल्या माहितीच्या आधारेच पुन्हा त्या विभागातील खासदारांना तिकीट दिलं जाणार आहे. संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल उत्तर प्रदेशच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आरएसएस सर्व्हे करून भाजपाला जिंकण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे, याची माहिती देणार आहे. मोदींची उत्तर प्रदेशमध्ये चांगली लोकप्रियता असली तरी त्यांना जोखीम पत्करायची नाही. त्यामुळेच त्यांनी वाराणसीमध्ये भाजपा नेते मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत.
गुजरातच्या नवसारीतले भाजपा खासदार सी. आर. पाटीलही जास्त करून स्वतःचा आठवडा हा वाराणसीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीच्या देखरेखीसाठी देत आहेत. तसेच गाझिपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष आणि चंदोलीचे खासदार महेंद्र नाथ पांडेयही वाराणसीमध्ये सक्रिय आहेत. भाजपाच्या झडफिया यांनी शेतकरी आणि मागासवर्गीयांसाठी भरपूर काम केलं आहे.