भारतातील लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी भाजपने जगभरातील 25 पक्षांना पाठवले निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 04:57 PM2024-04-10T16:57:10+5:302024-04-10T16:57:28+5:30
अमेरिकेसह 'या' देशातील पक्षांना निमंत्रण नाही.
Lok Sabha Election: यंदाची लोकसभा निवडणूक खुप खास असणार आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपने 400 पारचे ध्ये ठेवले आहे, तर दुसरीकडे पीएम मोदींचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष एकवटले आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अशातच, सत्ताधारी भाजपने विविध देशातील 25 हून अधिक राजकीय पक्षांना भारतातील लोकसभा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने 25 हून अधिक जागतिक पक्षांना लोकसभा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. या पक्षातील अनेक नेते भारतात येण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, भाजपने अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅट आणि विरोधी रिपब्लिकन, या दोन पक्षांना निमंत्रित केलेले नाही. अमेरिकन पक्षांना आमंत्रण न दिल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अमेरिकन पक्ष त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत व्यस्त आहेत. याशिवाय अमेरिकन पक्षांची रचना ही भारतातील किंवा युरोपीय देशांतील पक्षांसारखी नाही.
ब्रिटन आणि जर्मनीच्या पक्षांना आमंत्रण
भाजपने ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह आणि लेबर पक्षांना आमंत्रित केले आहे. याशिवाय, जर्मनीच्या ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि सोशल डेमोक्रॅट्स पक्षालाही निमंत्रित करण्यात आले आहे. शेजारील देश पाकिस्तानसोबतचे खराब संबंध पाहता, तिथल्या कोणत्याही राजकीय पक्षाला निमंत्रण दिलेले नाही. याशिवाय कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) लाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. पण, बांगलादेशातून शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी अवामी लीगला पाचारण करण्यात आले आहे.
भारताचा अजून एक शेजारी नेपाळबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय जनता पक्षाने माओवादी पक्षासह नेपाळमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना बोलावले आहे. याशिवाय श्रीलंकेतील सर्व प्रमुख पक्षांनाही पाचारण करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या रॅलीला उपस्थित राहणार
रिपोर्टनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात जगातील विविध देशांतील राजकीय पक्षांचे नेते भारतात येणार आहेत. परदेशातून येणाऱ्या निरीक्षकांना प्रथम भाजप आणि भारताची निवडणूक प्रक्रिया आणि दिल्लीतील राजकीय व्यवस्थेची माहिती दिली जाईल. यानंतर पक्षाचे नेते आणि भाजप उमेदवारांची भेट घेण्यासाठी 5 ते 6 निरीक्षकांचा गट 4-5 लोकसभा मतदारसंघात नेण्यात येईल. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसारख्या भाजप नेत्यांच्या रॅलींमध्ये परदेशी निरीक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे.