कर्नाटकात भाजपला करावी लागणार कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:18 AM2019-07-26T03:18:46+5:302019-07-26T03:19:06+5:30
ज्येष्ठांबरोबरच बंडखोरांनाही मंत्रीपदाची स्वप्ने
बंगळुरू : कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येदियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.
कर्नाटक मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह फक्त ३४ मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे. त्यामुळे भाजप व बंडखोर आमदारांमधील ज्यांना मंत्रीपदे मिळणार नाहीत ते येडीयुरप्पा यांच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरू शकतात. कर्नाटकात कोणीही सरकार स्थापन केले, तरी ते स्थिर राहू शकणार नाही, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
गुडघ्याला बाशिंग
कर्नाटक भाजपमध्ये यदियुरप्पा व त्या पक्षाचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांना मानणारे दोन गट आहेत. मुख्यमंत्र्यांनंतर सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पद आपल्यालाच मिळावे, अशी माजी मुख्यमंत्री जगदीश खट्टर, माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक, के. एस. ईश्वरप्पा, बी. श्रीरामुलू आदींची इच्छा आहे.