“अयोध्या-काशीनंतर आता मथुराही आवश्यक, श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे”: हेमा मालिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:01 PM2021-12-20T14:01:26+5:302021-12-20T14:02:20+5:30
काशी-विश्वनाथ कॉरिडॉरमधून पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी दिसून येते, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
इंदोर: अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिरानंतर आता मथुरा येथेही श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजप नेत्या आणि खासदार हेमा मालिनी यांनी अयोध्या आणि काशीनंतर त्यांचा मतदारसंघ मथुरालाही भव्य मंदिर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर साहजिकच मथुराही खूप महत्त्वाची आहे, असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
इंदोर दौऱ्यावर असताना हेमा मालिनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. काशी-विश्वनाथ कॉरिडॉरला भेट देण्यासाठी तेथे जाणार असल्याचेही हेमा मालिनी यांनी आवर्जुन सांगितले. प्रेम आणि आपुलकीचे प्रतिक असलेल्या मथुरेच्या जन्मभूमी तसेच मथुरेच्या खासदार या नात्याने म्हणेन की, तेथे भव्य मंदिर असावे. तेथे एक मंदिर आधीच आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित केलेल्या काशी-विश्वनाथ कॉरिडॉरसारखे नवीन स्वरूप दिले जाऊ शकते, असे हेमा मालिनी म्हणाल्या.
अयोध्या आणि काशीनंतर मथुराही आवश्यक
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्या की, अयोध्या आणि काशीनंतर मथुराही आवश्यक आहे. त्याचेही काम व्हायला हवे, ते अजून झालेले नाही. मथुरेची खासदार असल्याने मला असे म्हणायचे आहे की येथेही कृष्णाचे भव्य मंदिर असावे. काशी-विश्वनाथचे पुनरुज्जीवन आणि पुनर्विकासाचे परिवर्तन खूप कठीण होते. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल, असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधले जात असताना, कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत काहीतरी मोठे आणि भव्य बांधले जावे. रामाच्या भूमीत भव्य मंदिर बांधले आहे, पण कृष्णाच्या भूमीत काहीतरी मोठे घडायला हवे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बल्यान यांनी यापूर्वी म्हटले होते.