UP Election: डीबीटीमुळे भाजपाला मतांची आशा; राज्य, केंद्र सरकारने ५ वर्षांत वाटले ५ लाख कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 09:22 AM2022-01-10T09:22:47+5:302022-01-10T09:29:16+5:30
राज्य, केंद्र सरकारने ५ वर्षांत वाटले ५ लाख कोटी रुपये
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये लाभार्थांच्या खात्यांत केंद्र व राज्य सरकारने गेल्या ५ वर्षांत थेट पाठवलेल्या (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर-डीबीटी) ५ लाख कोटी रुपयांमुळे भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळण्याची आशा आहे. केंद्र सरकारने या रकमेपैकी ७५,९८४ कोटी रुपये तर गेल्या एका वर्षात १४६ योजनांतर्गत जन-धन खात्यांत पाठवले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या ५ वर्षांत २७ विभागांच्या १३७ योजनांतर्गत २.७५ लाख कोटी रुपये डीबीटी माध्यमातून लाभार्थींच्या खात्यांत पाठले आहेत.
प्रधानमंत्री किसान निधींतर्गत १.८८ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये पाठवले गेले. मनरेगांतर्गत उत्तर प्रदेशला २०१८-२०१९ मध्ये ५,४६५ कोटी रुपये, २०१९-२०२० मध्ये ६,२४० कोटी रुपये दिले. २०२०-२०२१ मध्ये १२,२५७ कोटी रुपये डीबीटीने पाठवले गेले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, उज्ज्वला योजना, प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ योजना आदींतर्गतही केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या लोकांना लाखो कोटी रुपयांची मदत केली आहे. आदित्यनाथ सरकारने गेल्या दीड वर्षापासून राज्यातील गरिबांना दरमहा प्रतिव्यक्ती १० किलो रेशन माेफत देत आहे.