अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:33 AM2024-06-03T07:33:01+5:302024-06-03T07:33:21+5:30

भाजपने लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधण्यापूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन हॅटट्रिक साधली; तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) ३२ पैकी ३१ जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन केले.

BJP in Arunachal; Sikkim 'SKM' only; Assembly elections in two states | अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक

अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या अरुणाचल प्रदेश व सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीचा रविवारी निकाल जाहीर झाला. भाजपने लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक साधण्यापूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन हॅटट्रिक साधली; तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) ३२ पैकी ३१ जागा जिंकत दुसऱ्यांदा सत्तेत पुनरागमन केले. २०१९ पर्यंत २५ वर्षे सत्तेत असलेल्या विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला (एसडीएफ) केवळ एक जागा राखता आली.  पक्षाध्यक्ष पवन कुमार चामलिंग यांना लढवलेल्या दोन्ही मतदारसंघांत पराभव पत्करावा लागला.

अरुणाचलच्या जनतेने विकासाच्या राजकारणाला निर्विवाद जनादेश देत भाजपवर पुन्हा विश्वास दाखवला. मी त्यांचे आभार मानतो. सिक्कीममध्ये एसकेएम व मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांचे विजयाबद्दल अभिनंदन. आगामी काळात सिक्कीमच्या प्रगतीसाठी मी राज्य सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

अजित पवार गटाचे तीन उमेदवार विजयी
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने ३ जागा जिंकल्या असून १० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. 
या विजयामुळे अजित पवार गटाचे आता देशातील तीन राज्यांत आमदार असून यात महाराष्ट्र, नागालँड आणि आता अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. 
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे निकील कामीन, लिखा सोनी आणि टोकू टाटम हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

फुटबॉल स्टार बायचुंग भुतिया पराभूत
भारताचे माजी फुटबॉल कर्णधार आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एसडीएफ) उपाध्यक्ष बायचुंग भुतिया यांचा नामची जिल्ह्यातील बारफुंग विधानसभा मतदारसंघात रविवारी एसकेएमच्या रिक्षल दोर्जी भुतिया यांच्याकडून पराभव झाला. रिक्षल यांना ८,३५८ मते मिळाली तर भुतिया यांना ४,०१२ मते मिळाली.

Web Title: BJP in Arunachal; Sikkim 'SKM' only; Assembly elections in two states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.