मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 06:36 AM2024-06-19T06:36:11+5:302024-06-19T06:37:10+5:30

भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला निर्णय; लाेकसभेच्या पराभवाचीही चर्चा.

BJP in Maharashtra will not make any change in leadership | मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे त्या पक्षाने मंगळवारी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपला जे अपयश आले, त्यानंतर भाजपच्या नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा होती. पण त्याला पक्षाच्या निर्णयाने पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांशी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना मंगळवारी सांगितले. 

यंदा लोकसभा निवडणुकांत भाजपने महाराष्ट्रात नऊ जागा जिंकल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात २२ जागा जिंकल्या होत्या.

विधानसभेसाठी भाजपची रणनीती

- भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोड मॅप दिला आहे. लोकसभा निवडणूक हरण्याच्या 
कारणांवरही यावेळी चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी व मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप मोठे निर्णय घेणार आहे.

- बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करणारे घटक आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उणिवा कशा दूर करता येतील, अशा सर्व मुद्द्यांवरही चर्चा झाली.

- फडणवीस म्हणाले की, आता भाजप महायुतीत समाविष्ट असलेल्या आपल्या मित्रपक्षांशीही चर्चा करणार आहे. 

- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा, मुस्लीम आणि मागासवर्गीय भाजपच्या विरोधात एकत्र येऊन मतदान करत असल्याचा मुद्दा 
चर्चिला गेला. 

ओम बिरला यांचे नाव आघाडीवर
१८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिरला यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली. यात मित्रपक्षांनी एकमताने अध्यक्षपदाचा निर्णय पंतप्रधान मोदींवर सोडण्याचा निर्णय घेतला.  

Web Title: BJP in Maharashtra will not make any change in leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.