"भाजपा कपटकारस्थानी पक्ष, या विधानसभा निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडवू’’, हेमंत सोरेन यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:28 PM2024-08-21T17:28:50+5:302024-08-21T17:29:32+5:30
Hemant Soren Criticize BJP: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे लोक कटकारस्थानी आहेत. ते केवळ समाजच नाही तर घर, कुटुंब आणि पक्ष तोडण्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप सोरेन यांनी केला.
इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये यावर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहे. मात्र या निवडणुकीला काही दिवस असतानाच राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चामध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यासर काही आमदार हे भाजपामध्ये जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे लोक कटकारस्थानी आहेत. ते केवळ समाजच नाही तर घर, कुटुंब आणि पक्ष तोडण्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप सोरेन यांनी केला.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गोड्डा येथे अनेक विकास योजनांचं उदघाटन आणि भूमिपूजन केलं. त्यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना सांगितले की, २०१९ मध्ये जेव्हा आमचं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून यांची कपटकारस्थानं सुरू आहेत. मात्र आमच्या इंडिया आघाडीच्या सरकारने सातत्यपूर्ण वाटचाल केली आहे.
कोरोनाकाळात आमच्या सरकारमधील तीन मंत्र्यांचा जनतेचं काम करताना मृत्यू झाला होता. आम्ही मागे हटणारे नाही आहोत. या निवडणुकीत आम्ही या राज्यामधून भाजपाचा धुव्वा उडवू. कधी या आमदाराला खरेदी कर, कधी त्या आमदारला खरेदी कर हे यांचं कामच आहे. पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याच्या जोरावर नेते आणि आमदारांना इकडून तिकडे जाण्यास वेळ लागत नाही. भाजपा गुजरात, महाराष्ट्र, आसाम येथून आपल्या नेत्यांना इथे आणून येथील आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांशी लढवण्याचं काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.