CAAनंतर मोदी सरकार आज पुन्हा मोठा 'धमाका' करणार?; खासदारांना 'व्हिप'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:01 AM2020-02-11T09:01:31+5:302020-02-11T09:16:04+5:30
भाजपाकडून राज्यसभा खासदारांना व्हिप; महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीनं आपल्या लोकसभा, राज्यसभेतल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सदनातल्या भाजपाच्या खासदारांना सदनात उपस्थित राहणं अनिवार्य असेल. या पार्श्वभूमीवर आज संसदेत नेमकं काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मोदी सरकार आज संसदेत एखादं महत्त्वाचं विधेयक मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यासोबतच संध्याकाळी चार वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. अर्थसंकल्पावर उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तरं देतील.
भाजपानं संसदेतल्या सर्व खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे भाजपाचे सर्व खासदार आज संसदेत उपस्थित असतील. आज एखाद्या महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४५ विधेयकं मंजूर करण्याचं लक्ष्य भाजपानं ठेवलं होतं. त्यामुळेच आज राज्यसभेत अतिशय महत्त्वाचं विधेयक मांडलं जाऊ शकतं. मात्र याबद्दल भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही.
पदोन्नती मूलभूत हक्क नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं एका निकालात म्हटलं आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. संघ आणि भाजपा आरक्षणविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केली. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दलितांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकार एखादं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची शक्यता आहे.