President Election 2022: 'वडीलांना मत दिलं की पार्टीला?'; जयंत सिन्हांच्या 'त्या' फोटोनंतर सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 03:54 PM2022-07-18T15:54:46+5:302022-07-18T15:55:34+5:30
द्रौपदी मुर्मू विरूद्ध यशवंत सिन्हा.. राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू
President Election 2022 Jayant Sinha: राष्ट्रपती निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात होताच नेतेमंडळींनी मतदान केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झटपट व्हायरल झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तर व्हील-चेअरवरून मतदानासाठी आले. एक-एक करत शिस्तबद्ध पद्धतीने संसद भवनाच्या आतील नेत्यांची छायाचित्रे मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. हजारीबागचे भाजपा खासदार जयंत सिन्हा यांनी सकाळी सव्वा ११च्या सुमारास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. त्यांचा फोटो सोशल मीडियावर येताच एक वेगळीच चर्चा सुरू झाली. ही चर्चा राजकीय असण्यापेक्षाही वेगळ्याच कारणासाठी रंजक ठरली. कारण, जयंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. अशा स्थितीत लोकांनी जयंत सिन्हा यांना प्रश्न विचारायला सुरूवात केली की जयंत सिन्हा यांनी आपल्या वडीलांना मतदान केले की वडीलांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले?
#PresidentialElection BJP MP Jayant Sinha, son of opposition President Candidate #YashwantSinha casting his vote.
— The Tall Indian (@BihariBaba1008) July 18, 2022
Only @jayantsinha ji knows now, whether he voted for NDA candidate #DraupadiMurmu or to his father. pic.twitter.com/H517Izdgju
भाजपाप्रणित NDA कडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून मुर्मू यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे पक्ष शिस्तीचा भाग म्हणून जयंत सिन्हा यांनी मुर्मू यांनाच मतदान करणे क्रमप्राप्त आहे. असे असताना आपले वडीलदेखील त्याच पदासाठी उमेदवार असल्याने जयंत सिन्हा यांची द्विधा मनस्थिती झाली असू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर दिसून आली.
नेटकरी काय म्हणाले पाहा....
एक नेटकरी लक्ष्य मल्होत्राने लिहिले की हे खूप मनोरंजक असेल. तर लवप्रीत सिंग नावाच्या युजरने विचारले की, भाजपने कोणताही व्हीप जारी केला आहे का? त्यावर या निवडणुकीत कोणताही पक्ष व्हीप देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया जनतेने व्यक्त केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी खासदार आणि आमदारांना व्हीआयपी देता येणार नाही असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपा खासदारांनाही सांगितले होते की, 'भाजपमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्याची ही निवडणूक तुमच्यासाठी शेवटची संधी आहे.' त्यांनी खासदारांना निवडणुकीत विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते.
एनडीए की राष्ट्रपति पद उम्मीदवार मा. द्रौपदी मुर्मू जी का झारखण्ड आगमन पर हार्दिक स्वागत व अभिनंदन है। pic.twitter.com/mRpNcys1Pc
— Jayant Sinha (@jayantsinha) July 4, 2022
जयंत सिन्हा यांनी मोदींच्या मंत्रिमडंळात भूषवलंय मंत्रिपद
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये जयंत सिन्हा हे केंद्रीय राज्यमंत्री होती. जयंत सिन्हा हे मोदी सरकार-१ मध्ये अर्थ राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री होते. २०१७ मध्ये यशवंत सिन्हा यांनी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला होता. देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते. खरे पाहता, यशवंत सिन्हा यांनी स्वतः वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद भूषवले आहे. वडीलांच्या आरोपांना उत्तर देताना जयंत सिन्हा यांनी एक लेख लिहिला होता. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांवर त्यांनी लेखमाला लिहून आपल्या वडीलांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले होते. त्यानंतर, पिता-पुत्राचे भांडण आहे, त्यांच्या मतभेद आहेत अशी चर्चा रंगली होती.