स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होत आहे आदिवासी महिलेचा सन्मान: जेपी नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:25 AM2022-07-18T06:25:05+5:302022-07-18T06:25:54+5:30
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.
काही दिवसांतच आपल्या प्रजासत्ताकाची धुरा एका नव्या राष्ट्रपतींच्या हाती असेल आणि या प्रतिष्ठेच्या पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला संपूर्ण देश कशा प्रकारे पसंती दर्शवत आहे ते आपण सर्व सध्या पाहत आहोत. द्रौपदी मुर्मू या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती असतील. अनेक दशकांपासून आपल्या देशात घराणेशाहीचे राजकारण आणि वैयक्तिक संपत्ती यांचे वर्चस्व पाहायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांची वाटचाल चैतन्यदायी ताज्या हवेचा प्रवाह म्हणावा लागेल. ओडिशामध्ये रायरंगपूर येथे त्यांनी एक शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर सिंचन विभागात कनिष्ठ सहायक म्हणून रुजू झाल्या.
तळागाळापासून सुरुवात करत १९९७ मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली आणि त्या रायरंगपूर नगर पंचायतीमध्ये पंचायत सदस्य बनल्या. तीन वर्षांनी त्यांनी रायरंगपूरमधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. २०१५ मध्ये त्यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल तसेच एखाद्या राज्याच्या राज्यपाल झालेल्या ओडिशातल्या पहिल्या आदिवासी महिला नेत्या म्हणून शपथ घेण्याचा बहुमान मिळवला. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या यशावर वैयक्तिक शोकांतिकेचे सावट होते. त्यांचे पती आणि मुलांचे निधन झाले. या संकटांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरित केले.
लोकशाही राष्ट्रांची उभारणी केवळ सरकारे आणि संस्थांद्वारे होत नाही तर ती जनता करते. गेल्या ८ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जेव्हा महामारी आली तेव्हा ८० कोटी लोकांना कित्येक महिने मोफत अन्नधान्य दिले गेले. लसीकरण अंतर्गत २०० कोटी मात्रा दिल्यामुळे कोविड विरुद्धचा जागतिक लढा अधिक मजबूत झाला आहे.
आमचे बहुतांश सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार हे मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आले आहेत. केंद्र सरकार खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या दूरदृष्टीला, त्यांच्या संकल्पनांना न्याय देत आपला कारभार करत आहे.
भाजपचा अध्यक्ष या नात्याने देशभरातील प्रत्येक राजकीय नेत्यांना आणि पक्षांना, मतदार गणाच्या प्रत्येक सदस्याला (इलेक्टोरल कॉलेजच्या प्रत्येक सदस्याला) आणि प्रत्येक भारतीयाला माझे कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी राजकीय मतभेद दूर ठेवावेत आणि सद्सद्विवेकबुद्धीने तुम्हाला आतून जे वाटतेय त्याला प्रतिसाद देत सन्मानीय द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. खरे तर सामाजिक न्याय आणि सामाजिक परिवर्तनाच्या आपल्या वाटचालीतला हा सर्वात गौरवशाली क्षण आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण तो गमावता कामा नये. कारण ही निवडणूक ‘लोकांचा राष्ट्रपती’ (‘पीपल्स प्रेसिडेंट’) निवडण्यासाठीची निवडणूक आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवे.
राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आदिवासी समाजातून आलेल्या एका कर्तबगार महिलेला या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळत असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. यापुढे एक महिला आपल्या देशाच्या राष्ट्रपतिपदावर विराजमान होणार आहे ही भावना महिलांनादेखील अधिक सक्षम करणारी आहे.