"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:51 AM2024-10-15T10:51:25+5:302024-10-15T10:53:48+5:30
JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) झारखंड निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. जेएमएम नेते मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
भाजप नेत्यांच्या सूचनेवर निवडणूक आयोग काम करत आहे का? असा सवाल मनोज पांडे यांनी केला आहे. मनोज पांडे म्हणाले, "आम्ही नेहमीच निवडणुकीसाठी तयार असतो... पण आज निवडणुका जाहीर होणार आहेत आणि भाजप नेत्यांना कालच याची माहिती मिळाली. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. निवडणूक आयोग भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करतो का? हिमंत बिस्वा सरमा यांनी काल दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज निवडणुका जाहीर होणार आहेत. कोणत्याही आयोगाला अशा प्रकारे कठपुतळीसारखे ठेवणे ही गंभीर बाब आहे."
दरम्यान, झारखंडच्या निवडणुका वेळेच्या एक महिना आधी होत असल्याचे जेएमएमचे म्हणणे आहे. तसेच, मनोज पांडे म्हणाले, "काल भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणाले, निवडणूक आयोग आज निवडणुकीची घोषणा करेल... आणि तेच झाले. बॉसने सर्व काही सेट केले आहे. काय सीन आहे." याशिवाय, या मुद्द्यावर निवडणूक आयोग काही बोलणार का? असा सवालही जेएमएमकडून करण्यात आला आहे.
#WATCH | Ranchi, Jharkhand: On ECI to announce Jharkhand Assembly elections today, JMM Leader Manoj Pandey says, "The election is to be announced today but BJP leaders got information about it yesterday itself. This is a very serious matter. Does the commission work at the behest… pic.twitter.com/2nTOuHmRg0
— ANI (@ANI) October 15, 2024
निवडणूक आयोगावर काँग्रेसनेही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनीही आज निवडणूक आयोगाने झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "तुम्हाला महाराष्ट्रासोबत झारखंडच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, पण हरयाणामध्ये ३ नोव्हेंबरला आणि महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरला सरकारचा कार्यकाळ संपत होता. मग या दोघांच्या निवडणुका एकत्र का घेतल्या नाहीत? जेव्हा तुम्ही आमचे ऐकत नाही, तेव्हा आम्हाला वाटते की, तुम्ही राजकीय कारणांसाठी किंवा विशिष्ट पक्षाच्या प्रभावाखाली अशा घोषणा करता. तरीही आम्ही निवडणूक आयोगाचा आदर करतो. आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि प्रत्येक परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ."