बिहारच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ?; अमित शाह यांच्या एका वाक्याने वाढवला नितीश कुमारांबाबत सस्पेन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:27 PM2024-01-19T16:27:03+5:302024-01-19T16:31:34+5:30
बिहारमध्ये बैठकांचा सपाटा आणि नेत्यांच्या भेटीगाठींनी राज्यातील राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले आहेत.
BJP Amit Shah ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. इंडिया आघाडीला धक्का देत नितीश कुमार हे पुन्हा एनडीएसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्या एनडीएतील एंट्रीच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली आहे.
अमित शाह यांनी एका वृत्तपत्राला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले की, नितीश कुमारांकडून एनडीएत सामील होण्याबाबतचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल. शाह यांच्या या वक्तव्यानंतर आरजेडी-जेडीयू युती तुटण्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे.
बैठकांची मालिका, बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्या निवासस्थानी भाजपच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. तर दुसरीकडे, नितीश कुमार यांनीही आपल्या आमदारांना पुढील सूचना मिळेपर्यंत पाटण्यात थांबण्यास सांगितलं आहे. तसंच बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या सर्व आमदारांना पाटण्यातच थांबायला सांगितलं आहे.
लालू आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
इंडिया आघाडीत फुटीची चर्चा असताना आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ खलबतं झाल्याचे समजते. मात्र ही नियमित बैठक असल्याचं तेजस्वी यादव यांनी सांगितलं असून बिहारमध्ये भाजपचा सुपडासाफ होईल, असाही दावा केला आहे.
दरम्यान, बिहारमधील सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या बैठकांचा सपाटा आणि नेत्यांच्या भेटीगाठींनी राज्यातील राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले आहेत. नितीश कुमार खरंच इंडिया आघाडीची साथ सोडणार की भाजपविरोधात आपली भूमिका कायम ठेवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.