Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 11:38 AM2020-08-06T11:38:58+5:302020-08-06T11:39:45+5:30
काश्मीर खोऱ्यात गेल्या ४८ तासांत सरपंचांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे.
कुलगाम - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. सज्जाद अहमद खांडे हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते. दरम्यान, याआधी जून महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथे घराबाहेर सज्जाद अहमद खांडे यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काश्मीर खोऱ्यात गेल्या ४८ तासांत सरपंचांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजारच्या अखरण भागात सरपंच पीर आरिफ अहमद शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.
यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्याचे सरपंच अजय पंडित यांना दहशतवाद्यांनी ठार केले होते. याशिवाय, जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजपा नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते.