हत्या प्रकरणात झाली भाजपा नेत्याला अटक
By admin | Published: July 3, 2017 12:48 AM2017-07-03T00:48:08+5:302017-07-03T00:48:08+5:30
वाहनातून बीफ नेत असल्याच्या संशयावरुन जमावाने येथे एका व्यापाऱ्याची बेदम मारहाण करुन हत्या केल्याच्या प्रकरणात एका भाजप
रामगढ : वाहनातून बीफ नेत असल्याच्या संशयावरुन जमावाने येथे एका व्यापाऱ्याची बेदम मारहाण करुन हत्या केल्याच्या प्रकरणात एका भाजप नेत्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्य एका व्यक्तीने न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे.
पोलीस अधीक्षक किशोर कौशल यांनी सांगितले की, या प्रकरणात स्थानिक भाजप नेते नित्यानंद महतो आणि संतोष सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य एक आरोपी छोटूराम याने रामगढ न्यायालयात आत्मसमर्पण केले. एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हजारीबाग जिल्ह्याच्या मनुआ गावातील बीफचा व्यापार करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यापाऱ्यास गुरुवारी जमावाने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. हा व्यापारी आपल्या वाहनातून बीफ घेऊन जात असल्याचा संशय होता. या जमावाने हे वाहनही जाळून टाकले.
येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले होते आणि कलम १४४ लागू केले. रामगढमध्ये परिस्थिती सामान्य आहे. पण, जिल्ह्यात ३३ संवेदनशिल जागी सुरक्षा दल तैनात आहे. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच गिरडीह जिल्ह्यात जमावाने गोहत्येच्या संशयावरुन एका व्यक्तीवर हल्ला केला होता. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.