आशिष शेलार दिल्लीत शरद पवारांची भेटीला; कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात
By देवेश फडके | Published: January 12, 2021 02:16 PM2021-01-12T14:16:56+5:302021-01-12T14:19:04+5:30
भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती.
नवी दिल्ली : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेण्यामागील कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून, अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत.
शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. यानंतर लगेचच भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजते. शेलार एकटेच पवारांना भेटल्याचे सांगितले जात आहे. ही भेट राजकीय असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतली असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. दुसरे म्हणजे ईडीच्या मुद्द्यावरूनही राजकारण तापलेले असताना या पार्श्वभूमीवर शेलार आणि पवार यांच्यात चर्चा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही आशिष शेलार आणि शरद पवार एका पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने एकत्रित आले होते. त्यावेळेस आशिष शेलार यांनी मराठा महिला राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शेलार यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ ओढवली होती.