"संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये", भाजपा महिला उपाध्यक्षाचा अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:09 PM2021-10-23T13:09:47+5:302021-10-23T13:10:58+5:30
उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार राज्याची प्रतिमा अपराध मुक्त राज्य अशी करत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच ...
उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार राज्याची प्रतिमा अपराध मुक्त राज्य अशी करत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते भर व्यासपीठावरुन महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राज्यातील महिलांनाच घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देत आहेत. उत्तराखंडच्या माजी राज्यपाल आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष बेबी रानी मौर्य यांनी वाराणसीतील एका कार्यक्रमात महिलांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊ नये, असं विधान केलं आहे.
वाराणसीतील बजरडीहामध्ये भाजपाच्या वाल्मिकी महोत्सव अंतर्गत मलिन वस्ती येथे महिलांसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. बेबी रानी मौर्य या कार्यक्रमात संबोधित करत होत्या. महिलांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊ नये, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे. इतकंच नव्हे, तर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं.
"पोलीस ठाण्यात महिला अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक जरी उपलब्ध असले तरी मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी ५ वाजल्यानंतर म्हणजेच अंधार झाल्यानंतर महिलांनी पोलीस ठाण्यात कधीच जाऊ नये. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात जावं आणि अगदीच गरज असेल तर आपला भाऊ, पती किंवा वडिलांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात जावं", असं बेबी रानी मौर्य म्हणाल्या.
शेतकऱ्यांना खत वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावर त्यांनी एक उदाहरणच दिलं. "सर्व अधिकारी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतात. मला नुकतंच आग्रा येथून एका शेतकऱ्याचा फोन आला होता. त्याला खत मिळत नव्हतं. मी सांगितलं तर त्याला खत उपलब्ध झालं. पण आज अधिकारी खत देण्यास नकार देत आहेत. अधिकाऱ्यांकडूनच स्थानिक पातळीवर फसवणुकीचं काम केलं जात आहे. या गोष्टी लोकांनीच स्थानिक पातळीवर पाहिल्या पाहिजेत. कोणताही अधिकारी फसवणुकीचं काम करत असेल तर त्याची तक्रार स्थानिकांनी डीएम, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करायला हवी", असंही बेबी रानी मौर्य म्हणाल्या.