सत्तेत आल्यास निजामाची चिन्हे आणि घुमट उद्ध्वस्त करू, भाजप नेत्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 05:23 PM2023-02-10T17:23:43+5:302023-02-10T17:23:59+5:30
Bandi Sanjay Kumar : बंदी संजय कुमार म्हणाले, "आम्ही सत्तेवर आलो तर नव्याने बांधलेल्या सचिवालयाच्या घुमटांसह तेलंगणातील निजामाची सांस्कृतिक चिन्हे नष्ट करू. आम्ही भारतीय आणि तेलंगण संस्कृती दर्शविणारे योग्य बदल करू."
तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास निजामाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या नव्याने बांधलेल्या राज्य सचिवालयाचे घुमट पाडू, अशी घोषणा तेलंगणातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांनी शुक्रवारी केले. 'जनम गोसा-भाजप भरोसा' कार्यक्रमांतर्गत कुकटपल्ली विधानसभा मतदारसंघाच्या परिसरातील ओल्ड बोईनपल्ली येथे झालेल्या सभेला संबोधित करताना बंदी संजय म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार निवडून आले तर राज्यातील निजाम राजवटीच्या गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या सर्व संरचना नष्ट केल्या जातील.
बंदी संजय कुमार म्हणाले, "आम्ही सत्तेवर आलो तर नव्याने बांधलेल्या सचिवालयाच्या घुमटांसह तेलंगणातील निजामाची सांस्कृतिक चिन्हे नष्ट करू. आम्ही भारतीय आणि तेलंगण संस्कृती दर्शविणारे योग्य बदल करू." यादरम्यान मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री केसीआर यांनी केवळ ओवैसींना खूश करण्यासाठी लोक सचिवालयाचे ताजमहालसारख्या समाधीत रूपांतर केले.
मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला असलेल्या प्रगती भवनचेही प्रजा दरबारात रूपांतर केले जाईल, अशी घोषणाही भाजप नेते बंदी संजय कुमार यांनी केली. तसेच, रस्त्यांच्या विस्तारीकरणात अडथळे निर्माण करणारी प्रार्थनास्थळे सरकार पाडेल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी शक्य असल्यास हैदराबाद शहरातील जुन्या रस्त्यांच्या मधोमध बांधलेल्या मशिदी पाडा, असे आव्हान केसीआर यांना दिले.
याचबरोबर, कुकटपल्लीतील गरीब लोकांच्या जमिनींवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अतिक्रमण केले होते आणि नंतर विरोध केल्यावर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप बंदी संजय कुमार यांनी केला. तसेच, राज्यात सर्वत्र भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आणून देत बंदी संजय म्हणाले की, भारत राष्ट्र समितीची अराजकीय राजवट आणि मोदी सरकारच्या यशोगाथा लोकांना सांगणे हा या पथ सभांचा उद्देश होता.