"सैफ अली खानवरील हल्ला ही इतकी मोठी घटना नाही, मलाही १४ वेळा गोळ्या लागल्याहेत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:32 IST2025-01-20T10:32:34+5:302025-01-20T10:32:34+5:30
Saif Ali Khan : सैफवर सहा वेळ चाकूने वार करण्यात आले. त्याच्यावर दोन सर्जरी झाल्या असून प्रकृती बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

"सैफ अली खानवरील हल्ला ही इतकी मोठी घटना नाही, मलाही १४ वेळा गोळ्या लागल्याहेत"
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सैफवर सहा वेळ चाकूने वार करण्यात आले. त्याच्यावर दोन सर्जरी झाल्या असून प्रकृती बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ही इतकी मोठी घटना नाही, मलाही १४ वेळा गोळ्या लागल्याहेत" असं म्हटलं आहे.
"ही घटना तुम्ही लोकांनी जितकी मोठी सांगितली आहे, तितकी मोठी नव्हती. मलाही १४ गोळ्या लागल्या आहेत, घटना घडत राहतात. तुम्हाला वाटलं असेल की काहीतरी घडलं असेल, तो माणूस तिथे कसा गेला असेल? कदाचित ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल. प्रसिद्धी मिळवण्याचा त्याचा हेतू असेल. जर आपण सैफ अली खानला मारलं तर आपण प्रसिद्ध होऊ. पण ही काही मोठी घटना नाही. देवाने सैफ अली खानला वाचवलं आहे आणि आता तो बरा होत आहे" असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.
"आम्हाला राजकारण हे सेवेचं माध्यम बनवायचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीने सेवेतूनच राजकारण करावं" असंही ते म्हणाले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील जोरदार निशाणा साधला. "दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत. ते इतरांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घेऊ शकतील? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शहजादला कसं पकडलं? CCTV फुटेजमधून मिळाला पुरावा
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. ३० वर्षीय आरोपीने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले होते. त्यामुळे तो अजूनही रुग्णालयात दाखल आहे. आरोपी शहजादला ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र काम केलं.