प्रेषित अवमानप्रकरण: भाजप नेत्याला कानपूरमध्ये अटक; आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:44 AM2022-06-08T08:44:29+5:302022-06-08T08:44:57+5:30
नुपूर शर्मा यांना भाजपमधून पाठिंबा वाढत असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.
कानपूर: भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अपमानकारक विधानाचे देशासह जगभरातील इस्लामी देशांत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. देशाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता भाजपच्या एका नेत्याला कानपूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपकडून नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला जात असून, या प्रकरणी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्याचा आरोप या भाजप नेत्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव हर्षित श्रीवास्तव असून, भाजपच्या फ्रंटल संघटनेच्या युवा मोर्चाचा तो मंत्री आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हर्षित श्रीवास्तव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य आहे. हर्षित यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आक्षेपार्ह असून, त्यात चुकीची टिप्पणी केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती कानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीणा यांनी दिली.
धार्मिक मुद्द्यांवर प्रवक्त्यांसाठी भाजपच्या मार्गदर्शक सूचना
भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत. भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित
भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नये. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात.
दरम्यान, निषेध करणाऱ्या आंतरराष्ट्रीय इस्लामी देशांमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत चालली आहे. कतार, इराण, कुवेतपाठोपाठ आता संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांनाही या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामध्ये सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे.