वरूण गांधींना 'मोदी टीम'मध्ये स्थान नाही, मनेका गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 01:07 PM2021-07-09T13:07:50+5:302021-07-09T13:09:25+5:30
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधी यांच्याकडे बाल-विकास मंत्रालयाची धुरा होती.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात एकूण 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या नव्या टीमने आपला कार्यभारही सांभाळला आहे. या मंत्रिमंडळात विस्तारात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनाही जागा मिळेल, असे कयास लावले जात होते. मात्र, असे झाले नाही. यानंतर आता मनेका गांधी यांवी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन दिवसीय सुल्तानपूर दौऱ्यादरम्यान मनेका गांधी यांनी माधमांशी संवाद साधला. "आम्ही 600 ते 650 च्या जवळपास खासदार आहोत. अशात पंतप्रधान किती लोकांना जागा देऊ शकतात. ज्यांना स्थान मिळाले ते योग्यच आहे."
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधी यांच्याकडे बाल-विकास मंत्रालयाची धुरा होती. मात्र, त्यांना दुसऱ्या कार्यकाळात स्थान मिळू शकले नाही. उत्तर प्रदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका आहेत. हे लक्षात घेत, उत्तरप्रदेशातील सात नेत्यांना मंत्री पद देण्यात आले आहे. मात्र, मनेका गांधी अथवा वरून गांधी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशवर अधिक फोकस -
उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशला अधिक महत्व देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या विस्तारात निवडणुकीपूर्वीच जातीय आणि क्षेत्रीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न करण्या आला आहे.
भाजपच्या अध्यक्षांनी मंत्र्यांना केले मार्गदर्शन
नव्या मंत्र्यांनी कशा प्रकारे कारभार करावा, तसेच त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व पक्षाला नेमके काय अपेक्षित आहे, याविषयी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्र्यांना मार्गदर्शनही केले.