हायवेवर सुसाट धावणाऱ्या गाड्यांसमोर 'ब्रेकर'! गडकरी म्हणाले, नवी स्पीड लिमिट ठरणार, लवकरच नवे नियम येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:53 PM2022-12-14T18:53:06+5:302022-12-14T18:54:13+5:30
यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात.
नवी दिल्ली - देशातील विविध महामार्गांवर वाहनांच्या नव्या वेगमर्यादेसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि राज्य सरकारांना विश्वासात घेऊन दोन लेन आणि चार लेनसह विविध महामार्गांवरील नवीन वेगमर्यादा लवकरच निश्चित केली जाईल, असे गडकरींनी म्हटले आहे.
यावेळी खेद व्यक्त करत गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. येथे दरवर्षी जवळपास पाच लाख अपघात होतात. या अपघातांमध्ये जेवढे लोक मृत्युमुखी पडतात तेवढे इतर कुठल्या साथीच्या आजारातही पडत नाहीत आणि दंगलींमध्येही मरत नाहीत. एवढेच नाही, तर असे अपघात कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच लोकांत जागृतीही निर्माण करत आहे. यासाठी प्रसिद्ध लोकांचीही मदत घेतली जात आहे, असेही गडकरी म्हणाले.
गडकरी म्हाणाले, सरकार नवे उच्च दर्जाचे रस्ते तयार करत आहे. यामुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल. यावेळी, हे नवे रस्ते तयार झाल्यानंतर, दिल्ली ते चंदीगड हे अंतर कमी होऊन केवळ अडीच तासांवर येईल. तसेच, दिल्लीहून जयपूर, डेहराडून आणि हरिद्वारला केवळ दोन तासांतच पोहोचता येईल.