पंतप्रधान मोदींना शांततेचं नोबेल मिळणार? नामांकन दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:32 AM2018-09-25T10:32:48+5:302018-09-25T10:35:55+5:30
आयुष्यमान भारत योजनेसाठी मोदींना नोबेल देण्याची मागणी
बंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावाची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी मोदींच्या नावाची शिफारस शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी केली आहे. मोदींनी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे मोदींना नोबेल पुरस्कार दिला जावा, असं सुंदरराजन यांनी म्हटलं आहे.
डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांच्या वतीनं त्यांच्या पतीनं मोदींना नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी नामांकन दाखल केलं आहे. सुंदरराजन यांचे पती एका खासगी विद्यापीठात नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. मोदींनी 23 सप्टेंबरला आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा लाभ देशातील 10 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. ही योजना लागू केल्याबद्दल मोदींना शांततेचं नोबेल देण्यात यावं, असं सुंदरराजन यांनी नामांकन अर्जात म्हटलं आहे.
स्वीडनचे उद्योगपती आणि शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. संशोधन, रसायन शास्त्रज्ञ, साहित्य, शांतता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव नोबेल पुरस्कारानं केला जातो. 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी हा पुरस्कार देण्यात आला होता. येत्या 10 डिसेंबरला नोबेल पुरस्काराचं वितरण होणार आहे.