अखिलेश 'कालचं पोरगं' तर मायावती 'होलिका'; भाजपा नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:16 PM2019-04-02T17:16:48+5:302019-04-02T17:17:38+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असतानाच विविध नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनाही उत आला आहे.

BJP leader Offensive statement on Akhilesh Yadav & Mayawati | अखिलेश 'कालचं पोरगं' तर मायावती 'होलिका'; भाजपा नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

अखिलेश 'कालचं पोरगं' तर मायावती 'होलिका'; भाजपा नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

Next

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असतानाच विविध नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनाही उत आला आहे. बेताल वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव यादव यांचा उल्लेख कालचं पोरगं तर मायावतींचा उल्लेख होलिका असा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

हरदोई येथी श्रवण देवी मंदिरात आयोजित कार्यकर्ता संमेलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या नरेश अग्रवाल यांनी मायावतींबाबत आक्षेपार्ह विधान करताना त्यांची तुलना होलिकेशी केली. ''होलिका दहनाची सुरुवात हरदोई येथून झाली होती. तेव्हासुद्धा बुआ जळाली होती. आजच्या निवडणुकीच्या वातावरणात बुआ आणि बबुआची जळण्याची वेळ आली आहे.''

यावेळी नरेश अग्रवाल यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. अखिलेश यादव यांची त्यांनी कालचं पोरगं, अशी संभावना केली. "अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री बनवणे ही चूक होती. ते सरकारी बंगला सोडताना नळाची तोटीसुद्धा उखडून घेऊन गेले. आता जनतेची तोटी उखडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका नरेश अग्रवाल यांनी केली. 

नरेश अग्रवाल यांनी भाजपाविरोधात तयार झालेल्या महाआघाडीवरही टीका केली. आघाडी ही पती-पत्नींमध्ये होते. भाऊ-बहीण आणि आत्यामध्ये कसली आघाडी, असा सवाल त्यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाची सत्ता असलताना सरकारमधील रिक्त पदे वेळीच भरली असती तर आज 22 पदे रिक्त राहिली नसती असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगवावला. 
नरेश अग्रवाल यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. नंतर त्यांनी भारतीय लोकतांत्रिक काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. पुढे ते समाजवादी पक्षात दाखल झाले. तर सपाची सत्ता गेल्यावर त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ते बसपात गेले. पुढे 2012 मध्ये सपा पुन्हा सत्तेत आल्यावर ते सपाच्या कोट्यातून राज्यसभेवर पोहोचले. तर 2017 मध्ये सपाची सत्ता गेल्यानंतर त्यांनी भाजपाचा हात धरत ते भाजपामध्ये दाखल झाले होते.  

Web Title: BJP leader Offensive statement on Akhilesh Yadav & Mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.