"मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार; मोदींनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 01:26 PM2021-10-15T13:26:57+5:302021-10-15T13:28:58+5:30
Lakhimpur Kheri Violence : भाजपाच्या एका नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची (Ashish Mishra) 12 तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान आता या प्रकरणावरून भाजपाच्या एका नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं अशी मागणी केली आहे.
भाजपाचे नेते आणि माजी आमदार राम इकबाल सिंह यांनी अजय मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली आहे. राम इकबाल सिंह यांनी "लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा दोषी आहेत. या हिंसाचाराआधी मिश्रा यांनी दिलेल्या भडकाऊ विधानानेच आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्यांनी खरंतर शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मात्र ते स्वतःच्या मुलाला वाचवण्याचं काम करत आहेत. त्यांना या हिंसाचारावर जरासाही पश्चाताप नाही" असं म्हटलं आहे.
"अजय मिश्रा आजही केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कायम"
"गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याला अटक झाली. मात्र अजय मिश्रा आजही केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कायम आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे. गेल्या काही दिवसात झालेली लखीमपूर हिंसाचाराची घटना आणि गोरखपूरमधील व्यापाऱ्याच्या हत्येनं पक्षाची बदनामी झाली आहे" असं देखील राम इकबाल सिंह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला"
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला आहे. केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांच्या कुटुंबांची काळजी आहे, ना हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांची" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच KisanKoNyayDo हा हॅशटॅग देखील वापरला आहे.