बीफबंदीविरोधात भाजपा नेत्याने दिला राजीनामा
By admin | Published: June 7, 2017 12:15 AM2017-06-07T00:15:43+5:302017-06-07T00:15:43+5:30
मांसासाठी बाजारात जनावरांच्या विक्रीवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मेघालायातील भाजपच्या दुसऱ्याही नेत्याने पक्ष सोडला
तुरा (मेघालय) : मांसासाठी बाजारात जनावरांच्या विक्रीवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मेघालयातील भाजपच्या दुसऱ्याही नेत्याने पक्ष सोडला आहे. बंदीच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी वेस्ट गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष बर्नार्ड मारक यांनी पक्ष सोडला होता. सोमवारी रात्री नॉर्थ गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष बाचू मारक यांनी राजीनामा दिला.
गारो लोकांच्या भावनांशी मी तडजोड करू शकत नाही. गाईचे मांस खाणे हा त्यांच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा भाग आहे, असे बाचू मारक यांनी म्हटले. मीदेखील गारो असल्यामुळे माझ्या समाजाच्या हिताचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. गाईचे मांस खाणे ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. भाजपची अ-धर्मनिरपेक्ष (नॉन सेक्युलर) विचारसरणी लादणे हे मान्य न होणारे आहे, असे बाचू मारक यांनी पक्षाचा राजीनामा देताना म्हटले.