जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 07:58 AM2019-05-05T07:58:55+5:302019-05-05T08:00:50+5:30
पोलिसांकडून मारेकरी दहशतवाद्यांचा शोध सुरू
श्रीनगर: दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मोहम्मद मीर यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. शनिवारी रात्री ही घटना घडली.
परिसरात अटल नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुल मोहम्मद मीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. मीर यांच्या हत्येबद्दल भाजपाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी मीर यांच्या हत्येचा निषेध केला. 'मी या निर्घृण हत्येचा निषेध करतो. गुल मोहम्मद मीर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य मिळो,' असं अब्दुल्ला म्हणाले. पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला.