होय, RSS च्या शाखेत जायचो; आता जय श्रीरामही बोलायला लागलो : शुभेंदु अधिकारी
By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 10:29 AM2021-01-03T10:29:31+5:302021-01-03T10:32:28+5:30
काही दिवसांपूर्वी अधिकारी यांनी केला होता भाजपामध्ये प्रवेश, लोकांना बदल हवा असल्याचं केलं वक्तव्य
येत्या काही दिवासांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. एकीकडे राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपानंही या निवडणुकांमध्ये स्वत:ला झोकून दिलं आहे. तसंच आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्कीच विजय मिळेल असा विश्वासही अनेक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच काही दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपाशी आपण सुरूवातीपासून जोडले गेलेलो होतो अशी आठवण सांगणताना आपण लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असल्याचं अधिकारी म्हणाले.
"शालेय दिवसांमध्ये मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जात होतो. मी कधीच अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा भाग नव्हतो. मी व्यक्तीगतरित्या तृणमूल काँग्रेसमध्येही याविरोधात आवाज उठवला. मी गायत्री मंत्राचा जप करतो. मी कधी कोणत्या राजकीय मंचावर जय श्रीराम म्हटलं नाही, परंतु आता मी ते म्हणतोय. मी घरातून कपाळावर टिळा लावून बाहेर पडत नाही. परंतु लोकं माझ्या कपाळी टिळा लावतात. मंदिरात जाण्यात काय चुकीचं आहे? मी कार्यकर्ता असल्याच्या नात्यानं भाजपाच्या धोरणांचं पालन करत आहे," असं शुभेंदु अधिकारी यावेळी म्हणाले. त्यांनी आजतकला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.
"पश्चिम बंगालच्या जनतेला आता बदल हवा आहे आणि या ठिकाणी भाजपाचं सरकार बनणार आहे. बंगालची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तृणमूल काँग्रेस एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि ममता बॅनर्जी त्याच्या चेअरपर्सन. अभिषेक बॅनर्जी हे त्याचे व्यवस्थापकीय संचालक आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांचं स्थान पक्क करण्यासाठी आपल्या पक्षातील नेत्यांकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप अधिकारी यांनी केला.
टीएमसीचे अनेक नेते प्रवेश करतील
"मी बूथ पातळीवर काम करणार आहे. टीएमसीला बूथ स्तरावर एकही कार्यकर्ता मिळणार नाही हेदेखील मी पाहिन. दररोज कोणी ना कोणी भाजपामध्ये सामील होईल यावर मी जास्त लक्ष देणार आहे. मी पक्षासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन. येत्या काळात टीएमसीचे अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील. ही तर फक्त सुरूवात आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
बदलांची मागणी
"पश्चिम बंगालचा विकासाच्या मुद्द्यावर माझी भाजपासोबत डील झाली आहे. पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्व आहे. बंगालची लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करतील. आता बंगालमध्ये बदलांची मागणी होत आहे. गेल्या १० वर्षांमध्ये या ठिकाणी काहीही बदललं नाही. अनेक नेत्यांनी भाजपासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यांना लोकांसाठी काम करायचं आहे त्यांनी भाजपासोबत जोडलं गेलं पाहिजे," असंही शुभेंदु अधिकारी यांनी स्पष्ट केलं.