पंजाबचे पोलीस अधिकारी कोणत्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:25 IST2022-01-12T13:25:34+5:302022-01-12T13:25:59+5:30
PM Narendra Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीवरून स्मृती इराणी यांनी केला हल्लाबोल.

पंजाबचे पोलीस अधिकारी कोणत्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल
PM Narendra Modi Security Breach : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून पुन्हा एकदा भाजपनं काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. या मुद्द्यावरून त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. तसंच पंजाब पोलीस (Punjab Police) कोणत्या बड्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. "मीडियाच्या माध्यमातून सत्य समोर आलं आहे. मी मंचावरून दे प्रश्न उपस्थित केले होते, तेच या स्टिंग ऑपरेशनमध्ये आहेत. पंजाब काँग्रेसचे नेता या प्रकरणी अयोग्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील चूक ही नींदनीय आणि दंडात्मक देखील आहे," असं इराणी म्हणाल्या. तसंच काँग्रेसच्या कोणत्या बड्या नेत्याच्या इशाऱ्यावर पोलीस अधिकारी काम करत होते, असंही विचारायचं असल्याचं त्या म्हणाल्या.
"डीजीपींनी कोणत्याही माहितीशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा टीमला मार्ग मोकळा असल्याचं आणि पूर्ण व्यवस्था असल्याचं का सांगितलं?, इशाऱ्यानंतरही पंतप्रधानांना सुरक्षा देण्यासाठी पंजाबमधील काँग्रेस सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी कोण आहेत ज्यांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत.,?" असा सवालही त्यांनी केला. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉल आणि उल्लंघनाबाबत एका प्रायव्हेट पार्टीला का माहिती दिली?, जे गांधी कुटुंबाचाही भाग आहेत, ते या विषयी का इच्छुक आहेत," असा सवालही त्यांनी केला.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर
"मी न्यायालयच्या निर्णयाचा आदर करते, तसंच यावर कोणतंही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. समिती स्थापन केल्यानंतर जी तथ्य समोर येतील आणि जो पक्षाचा आदेश असेल त्यावर मी वक्तव्य करेन," असंही त्या सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.