ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी
By जयदीप दाभोळकर | Published: January 31, 2021 03:37 PM2021-01-31T15:37:09+5:302021-01-31T15:39:43+5:30
तृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, कोरोनामध्येही महापाप केलं, स्मृती इराणींचा हल्लाबोल
येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच भाजप आणि पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस यांनी आपली कंबर कसली आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. भाजपचे अनेक नेते पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. नुकताच अमित शाह यांचा नियोजित पश्चिम बंगालचा दौरा रद्द झाला. परंतु त्यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पश्चिम बंगालला पोहोचल्या. हावडामध्ये आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच काय तर त्यांनी बंगाली भाषेत आपलं भाषण केलं. तसंच ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामचा द्वेष असून या ठिकाणी रामराज्य स्थापन होणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
"यावेळी पश्चिम बंगालमध्ये रामराज्य स्थापित होणार आहे. दीदी यावेळी तृणमूल काँग्रेस सत्तेतून पायउतार होणार आहे आणि भाजप सत्तेत येणार आहे," असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांच्या रॅलीदरम्यान बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि बंगाल भाजप प्रमुख दिलीप घोष हेदेखील उपस्थित होते. "पहिल्यांदा कोणत्या नेत्यानं कट मनी स्वीकारलं. हे सरकार तांदूळ आणि डाळ चोर आहे. दीदींनी कोरोना महासाथीतही महापाप केलं आहे," असंही त्या म्हणाल्या.
"जो पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठई केंद्र सरकारचा द्वेष करतो, जो आपल्याच लोकांना दूर करतो, जो जय श्रीरामच्या घोषणेचा अवमान करतो त्या पक्षाला कोणीही राष्ट्रभक्त ठरवू शकत नाही," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी शुभेंदू अधिकारी यांनीदेखील तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. "तृणमूल काँग्रेस ही आता लिमिटे़ड कंपनी झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत टीएमसी प्रायव्हेट लिमिटेड पूर्णपणे रिकामी होईल. त्यात कोणीच शिल्लक राहणार नाही," असं अधिकारी म्हणाले.
अमित शाह यांचाही हल्लाबोल
ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचं सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडलं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.