“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 11:49 AM2021-03-30T11:49:30+5:302021-03-30T11:53:37+5:30
भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने घरचा अहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे. (bjp leader subramanian swamy says now forget to getting pok and liberating balochistan)
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy) ट्विटरवर कायम सक्रीय असतात. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
POK वर ताबा मिळवणे विसरा
एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.
२०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला
मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे
अलीकडेच खासदार स्वामी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे कसे साध्य होईल, याच्या युक्त्यांवर पुस्तक लिहावे, असा टोला स्वामी यांनी लगावला होता. चीन आणि पाकिस्तानच्या धोरणांमुळे नेपाळ, भूटान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावत चाललो आहोत, असा आरोप स्वामी यांनी केला होता.
दरम्यान, तजाकिस्तान येथे होणाऱ्या हार्ट ऑफ आशिया संमेलनात भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. परंतु, दोन्ही देशांमध्ये चर्चेचा कोणताही कार्यक्रम ठरवण्यात आलेला नाही. कारण पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे.