भाजपच्या नेत्यांना दिल्लीत वाटण्यासाठी मिळाले होते प्रत्येकी १० हजार रुपये, संजय सिंह यांचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:01 IST2025-01-10T13:56:24+5:302025-01-10T14:01:15+5:30
Delhi Elections 2025 : भाजपच्या काही नेत्यांनी मतं खरेदी करण्यासाठी दिल्लीत १ हजार रुपये वाटले. या प्रकरणाची संपूर्ण दिल्लीत चर्चा झाली. उघडपणे पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे संजय सिंह यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्यांना दिल्लीत वाटण्यासाठी मिळाले होते प्रत्येकी १० हजार रुपये, संजय सिंह यांचा मोठा आरोप
Delhi Elections 2025 :दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच आपचे नेते संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी मतं खरेदी करण्यासाठी दिल्लीत १ हजार रुपये वाटले. या प्रकरणाची संपूर्ण दिल्लीत चर्चा झाली. उघडपणे पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे संजय सिंह यांनी सांगितले.
आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. हे खूप गंभीर आहे. गैरवर्तन करणाऱ्या पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी आपल्या नेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये लोकांना वाटण्यासाठी दिले होते. १०-१० हजार रुपये वाटा आणि मते खरेदी करा, असे सांगतिले होते. मात्र, त्यांच्या नेत्यांना वाटले की ते निवडणुकीत पराभूत होणारच आहेत, म्हणून निवडणुकीत पैसे कमवणे चांगले होईल, असे संजय सिंह म्हणाले.
यानंतर पक्षाने एक नवीन पद्धत स्वीकारली. नेत्यांना सांगितले की, तुमच्या खिशात ९ हजार रुपये ठेवा आणि १ हजार रुपये वाटा. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत एक-एक हजार रुपये वाटण्यात आले. ९-९ हजार रुपये वाचवण्यात आले. मी गैरवर्तन करणाऱ्या पक्षाला सर्वांसमोर सत्य उघड करण्यास सांगू इच्छितो. जर तुम्हाला प्रत्येकी १० हजार रुपये दिले होते तर तुम्ही ते संपूर्ण पैसे का वाटले नाहीत? तुम्ही जनतेचे प्रत्येकी ९ हजार रुपये का घेतले? असा सवालही संजय सिंह यांनी केला.
जर ते तुमच्याकडे मतं मागण्यासाठी आले तर त्यांना सांगा की तुमच्या नेत्यांनी १० हजार रुपये पाठवले होते. त्याचे ९ हजार रुपये कुठे आहेत? दिल्लीच्या जनतेला त्यांचा भ्रष्टाचार उघड करावा लागेल, असेही संजय सिंह म्हणाले. याचबरोबर, पूर्वांचलच्या मुद्द्यावर संजय सिंह म्हणाले की, मी सभागृहात असेही म्हटले होते की, पूर्वांचलमधील लोकांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत. त्यांना रोहिंग्या आणि बांगलादेशी म्हटले जात आहे. तसेच, माझ्या पत्नीचे मत रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज देण्यात आल्याचा आरोपही संजय सिंह यांनी विरोधकांवर केला आहे.