...म्हणून राज्यातील भाजप नेते दिल्लीला गेले होते; अखेर समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:43 AM2021-08-10T09:43:03+5:302021-08-10T09:43:52+5:30

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार गैरहजर

bjp leaders in maharashtra meets central leaders to straighten communication | ...म्हणून राज्यातील भाजप नेते दिल्लीला गेले होते; अखेर समोर आलं कारण

...म्हणून राज्यातील भाजप नेते दिल्लीला गेले होते; अखेर समोर आलं कारण

googlenewsNext

- विकास झाडे

नवी दिल्ली : दिल्लीत डेरेदाखल झालेल्या भाजपच्या कोअर टीममधील नेत्यांनी सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बैठक घेतली, त्याला ‘फक्त दुपारचे जेवण’ असे नाव देण्यात आले. रात्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी भोजनासोबत संगीत मैफलीचा आनंद घेतला. माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार हे मात्र गैरहजर होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येक राज्यातील संघटनेमधील महत्त्वाचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात सुसंवाद वाढवण्यात यावा, अशा सूचना दिल्या. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशभरातील सर्व प्रदेश अध्यक्षांना कोअर टीमच्या नेत्यांसह दिल्लीचे आमंत्रण दिले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात या भेटीगाठी घ्यायच्या असल्याने पहिल्या टप्प्यात राजस्थान, उत्तर प्रदेश उरकले. हा आठवडा महाराष्ट्राचा होता.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेत्यांच्या दिल्ली भेटीचे नियोजन केले. शनिवारपासूनच ते दिल्लीत आले आहेत, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्लीत आले आहेत. विशेष म्हणजे ते महाराष्ट्र सदनाला फाटा देत बाहेर हॉटेलमध्ये थांबले आहेत. अन्य कोअर टीमचे सदस्यही दिल्लीत आहेत. प्रारंभी नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांची या मंत्र्यांची कोअर टीमने भेट घेतली. काहींची भेट गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही झाली. सोमवारी दुपारी हे नेते नितीन गडकरी यांच्या घरी जेवणाला जमले. यात चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी राज्यातील राजकीय तसेच संघटनात्मक स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. 

कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटी
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
दानवे यांच्या निवासस्थानी नवीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हे चारही मंत्री १६ ते २४ ऑगस्टपर्यंत त्यांच्या विभागात संपर्क यात्रा काढून मोदींनी केलेल्या कामांची उजळणी करणार आहेत.

Web Title: bjp leaders in maharashtra meets central leaders to straighten communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.