सिसोदियांकडे पराली घेऊन पोहोचले भाजपा नेते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:31 PM2019-11-07T17:31:19+5:302019-11-07T17:32:16+5:30
भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल व इतर नेते सायकलवर पराली घेऊन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले.
नवी दिल्ली : भाजपाचे राज्यसभा खासदार विजय गोयल व इतर नेते सायकलवर पराली घेऊन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले. याठिकाणी त्यांनी काहीवेळ निदर्शने केली आणि दिल्लीतील प्रदूषणासाठी आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. पंजाब व हरियाणामध्ये पराली जाळण्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले होते. त्यावर पंजाबमध्ये शेतक-यांना पराली जाळण्यासाठी तेथील आम आदमी पार्टीचेच आमदार प्रोत्साहन देत असल्याचा आरोप विजय गोयल यांनी आज केला.
मथुरा मार्गावर सिसोदिया यांच्या निवासस्थानापुढे दिल्ली भाजपच्या नेत्यांनी ही निदर्शने केली. ‘केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे सदस्य ढोंगी आहेत. एकीकडे ते दिल्लीतील प्रदूषणासाठी पंजाबला दोषी ठरवतात आणि दुसरीकडे त्यांचेच आमदार पंजाबमध्ये पराली जाळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत,’ असे गोयल म्हणाले. सिसोदिया यांनी भाजप नेत्यांची निदर्शने त्यांचीच दोन रुपे दाखवत असल्याचे म्हटले आहे. ‘भाजपाचे लोक सुरुवातीला दिल्लीतील प्रदूषणासाठी स्थानिक स्त्रोत कारणीभूत असल्याचे म्हणत होते. आता कमीत कमीत ते परालीमुळे प्रदूषण होत असल्याचे मान्य करीत आहेत, हे महत्त्वाचे आहे,’ असे उत्तर सिसोदियांनी दिले आहे.