भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडीओने पक्षाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:23 AM2023-06-24T08:23:48+5:302023-06-24T08:24:38+5:30
गौरीशंकर बिसेन हे भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडरओवरून वाद निर्माण झाला आहे.
- अभिलाष खांडेकर
भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माजी सहकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कृतीने भाजपला धक्का बसला आहे व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
गौरीशंकर बिसेन हे भाजपचे प्रमुख नेते असून, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडरओवरून वाद निर्माण झाला आहे. एका मुलीला ते आपल्याकडे ओढत आहेत व ती सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी मध्यप्रदेश काँग्रेसने एका मिनिटापेक्षा कमी कालावधीची व्हिडीओ क्लिप ट्विट केली आहे. लोकमत माध्यम समूह या क्लिपच्या सत्यतेला दुजोरा देत नाही.
वरवर पाहता हे कोणत्याही हेतूशिवाय केलेले वर्तन दिसते; परंतु काँग्रेसने भाजप नेत्याचे हे निर्लज्ज वर्तन आहे, अशी टीका केली आहे. बिसेन हे मध्यप्रदेश मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत.
काँग्रेसची जोरदार टीका
बालाघाटमधील हा व्हिडीओ कोठे आणि कोणत्या कार्यक्रमात काढण्यात आला, याचा तपशील लगेच मिळू शकला नाही. काँग्रेसने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकीकडे चौहान हे स्वत:ला मुलींचे पालक, मामा म्हणवून घेतात आणि दुसरीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा असा व्हिडिओ व्हायरल होतो, यावरून भाजपची नेमकी भूमिका काय, हे स्पष्ट होते, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष जे. पी. धनोपिया यांनी म्हटले आहे.