भाजपकडून चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती; प्रकाश जावडेकरांकडे मोठी जबाबदारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:36 PM2023-07-07T20:36:29+5:302023-07-07T20:39:36+5:30
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.
नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच भाजपने काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. यानंतर आता शुक्रवारी(दि.7) चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर तेलंगाणा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या वर्षाच्या शेवटी देशातील चार राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या चारही राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्त्या भाजपने केल्या आहेत. 9 जणांच्या नियुक्त्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांचाही समावेश आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने आगामी विधानसभा चुनाव - राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश एवं तेलंगाना के लिए प्रदेश चुनाव प्रभारी एवं सह-चुनाव प्रभारियों की नियुक्तियां की। pic.twitter.com/d3l1ctNcVZ
— BJP (@BJP4India) July 7, 2023
पक्षाने राजस्थानची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली आहे. याशिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते ओपी माथूर यांच्याकडे छत्तीसगड, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मध्य प्रदेश आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तेलंगणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि हरियाणाचे नेते कुलदीप बिश्नोई हे राजस्थान निवडणुकीसाठी सहप्रभारी असतील, तर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हे छत्तीसगडचे सहप्रभारी असतील. याशिवाय, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे मध्य प्रदेशचे सहप्रभारी असतील, तर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांना तेलंगणाचा सहप्रभारी करण्यात आले आहे. मिझोरामसह चारही राज्यांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत.