मिशन 2024! माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या 3 दिग्गज नेत्यांना BJP मध्ये मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 06:48 PM2022-12-02T18:48:36+5:302022-12-02T19:11:17+5:30
2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी शिल्लक आहे, पण भाजपने तयारी सुरू केली आहे.
नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक ते दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे, पण भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपने यापूर्वी काँग्रेसचा मोठा चेहरा असलेल्या अनेक नेत्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यातच छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी भाजपने अनेक बड्या चेहऱ्यांना पक्षात महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
जयवीर शिरगिल भाजपमध्ये
प्रत्येक आघाडीवर काँग्रेसची ढाल बनलेल्या जयवीर शेरगिल यांना भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते बनवून पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. शेरगिल हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि तर्कशुद्ध संभाषणासाठी ओळखले जातात. शेरगिल यांनी तीन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कॅप्टन यांचा पक्ष भाजपात विलीन
कॅप्टन यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी संबंध तोडून पंजाब लोक काँग्रेस या नावाने पक्ष स्थापन केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी स्वतःची परंपरागत विधानसभेची जागाही गमावली. निवडणुकीतील पराभवानंतर काही महिन्यांनी कॅप्टन यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता. कॅप्टनच्या येण्याने भाजप शिखांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
सुनील जाखड भाजपात
त्याचबरोबर पंजाबचे आणखी एक तगडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बलराव जाखड यांचे पुत्र सुनील जाखड हेदेखील भाजपला पंजाबमध्ये मजबूत करताना दिसणार आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि मे महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. आता पंजाबमध्ये जाखड यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला कितपत फायदा होईल हे पाहायचे आहे.
स्वतंत्रदेव सिंह यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे माजी अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचीही राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्तराखंड युनिटचे प्रदेशाध्यक्ष असलेले मदन कौशिक यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य बनवण्यात आले आहे. यासोबतच छत्तीसगड भाजपचे माजी अध्यक्ष विष्णुदेव साई आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष मनोरंजन कालिया, अमनजोत कौर रामुवालिया आणि एस. राणा गुरमीत सिंग सोढी यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.