उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव होणार; योगी सरकारमधील मंत्र्यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 05:02 PM2019-05-19T17:02:58+5:302019-05-19T17:04:18+5:30
उत्तर प्रदेशात भाजपाला 15 जागा मिळतील तर सपा-बसपाला 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एक तृतीयांश जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील
बलिया - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाला मिळालेल्या विजयाच्या वाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि योगी सरकारमधील मंत्री ओमप्रकार राजभर यांनी भाजपाविरोधी भविष्यवाणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असून समाजवादी पार्टी आणि बसपा आघाडी प्रचंड यश मिळेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
ओमप्रकाश राजभर यांनी सांगितले की, यंदा देशात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. मात्र पूर्वांचलमध्ये सपा-बसपा आघाडीला चांगले यश मिळेल. कमीत कमी 30 जागांवर आमची साथ न मिळाल्याने भाजपाच्या जागांवर परिणाम होईल. गोरखपूर, गाजीपुर आणि बलिया लोकसभा जागांवर भाजपाचा पराभव होईल.
उत्तर प्रदेशात भाजपाला 15 जागा मिळतील तर सपा-बसपाला 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एक तृतीयांश जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील. तसेच दिल्लीतील खुर्चीवर दलिताची मुलगी बसेल असंही त्यांनी सांगितले.
आम्ही भाजपाकडे घोसी लोकसभेची जागा मागत होतो मात्र आम्हाला ती जागा नाकारण्यात आली. त्यामुळे देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत नाही. राजकारणात अनेक पर्याय उपलब्ध असतात. सुभासपाची वाढती ताकद भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. मी उत्तर प्रदेशातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा स्वीकार करण्याचा विषय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा आहे.