जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:12 PM2024-10-08T16:12:57+5:302024-10-08T16:29:34+5:30

JK Election BJP Results : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नसली तर मोठं यश मिळवता आलं आहे.

BJP lost the elections in Jammu and Kashmir but Won more seats than last time | जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...

Jammu Kashmir Result 2024 : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठीचे निकाल बऱ्यापैकी समोर आले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने आरामात बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या निवडणुकीत भाजपनेही जोरदार लढत देत दुसरे स्थान मिळवलं आहे. भाजप जम्मू काश्मीरमध्ये २६ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत मात्र भाजपला सत्तेत येता आलं नसलं तरी मोठे नुकसानही झाले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने १० वर्षांत पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये निम्म्या जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि जेकेएनसीने ४९ पेक्षा जास्त जागांसह आपली मजबूत आघाडी कायम ठेवली आहे. तर भाजपने आतापर्यंत २८ पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. भाजपचा जम्मू काश्मीर निवडणुकीत पराभव होत असला तरी पक्षामध्ये आनंदाचे कारण आहे.

यंदाच्या निवडणुकीत पूर्वीप्रमाणेच जम्मू काश्मीरमध्ये भाजपला यश मिळाल्याचे दिसत आहे. जम्मू प्रदेशात जागांची संख्या कमी असतानाही भाजपने अनेक निवडणुकांमध्ये २५ ते २६ जागा सातत्याने जिंकल्या आहेत. याआधी २०१४ मध्येही भाजप २६ जागांवरच पुढे होती. तर काश्मीर खोऱ्यात भाजपला जागा मिळवणे आजही कठीण जात आहे. या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतरही भाजप जिथे होता तिथेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भाजपसाठी चिंतेची बाब असली तरी यामुळे कोणताही तोटा झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीपेक्षा भाजपची मतांची टक्केवारी जास्त आहे. भाजपला २५.६६ टक्के मते मिळाली आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सला २३.४४ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत ११.९५ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही आनंदाची आणि फायद्याची गोष्ट आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने २०२४ च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप युती जून २०१८ मध्ये तुटली. भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्या नंतर दोन्ही पक्षांचा मार्ग वेगळा झाला. वेगळे झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या भागात राज्यपाल राजवट लागू केली होती. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पूर्वीचे राज्य जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले होते. त्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत.

भाजपची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

"भाजपची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आम्ही ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढलो. दुसरीकडे, इंडिया आघाडीत ध्रुवीकरणाचीही चर्चा होती. काँग्रेससाठी एकच निष्कर्ष निघेल की, हरयाणात ज्या प्रकारे त्यांची साफसफाई झाली, तशीच येथेही साफसफाई झाली आहे. आमची लढाई प्रामुख्याने काँग्रेस पक्षाशी होती आणि जी प्रवृत्ती संपूर्ण देशात दिसत आहे, तीच प्रवृत्ती जम्मू-काश्मीरमध्येही दिसून आली," असे  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.

Web Title: BJP lost the elections in Jammu and Kashmir but Won more seats than last time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.