भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लॅन! मिशन 2024 साठी '60-70' फॉर्म्युला तयार, अशी असेल रणनीती...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:16 PM2023-01-25T16:16:44+5:302023-01-25T16:17:43+5:30
Loksabha Election 2024 : भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे.
नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. यातच भाजपने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा मास्टर प्लॅन बनवला आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम राबवणार आहे.
इतकेच नाही तर भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याकांच्या परिषदेसाठी भाजपचीही मोठी योजना असून या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करू शकतात, असे म्हटले जात आहे. भाजपच्या सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजप आपल्या स्कूटर यात्रेत मुस्लिम धर्मगुरूंचाही समावेश करू शकतो, याबाबतच्या रणनीतीवर पक्षात चर्चा होत आहे.
भाजपच्या प्लॅननुसार, भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 5000 मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना पक्षाशी जोडेल. तसेच, मुस्लिम धर्मगुरूंना जोडून भाजप केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा प्रचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात आउटरीच कार्यक्रम आयोजित केल्यानंतर भाजप अल्पसंख्याक स्नेहसंमेलन आयोजित करणार आहे.
भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 60-70 लोकसभा मतदारसंघ आधीच अधोरेखित केले आहेत, असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, या सर्व अल्पसंख्याक बहुल लोकसभेच्या जागा आहेत, जेथे अल्पसंख्याक समुदाय बहुसंख्य प्रमाणात आहे. प्लॅननुसार, भाजप 60-70 लोकसभा मतदारसंघात सुफी, सुशिक्षित मुस्लिम, डॉक्टर, इंजिनियर, विणकर, कारागीर, छोटे व्यापारी यांच्यात आपली पकड निर्माण करेल आणि त्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
याचबरोबर, प्लॅननुसार लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप अल्पसंख्याक लोकसभा मतदारसंघात बूथ व्हेरिफिकेशन आणि पन्ना समिती व्हेरिफिकेशनचे काम लवकरच सुरू करणार आहे. तसेच, भाजप या वर्षी एप्रिल/मे महिन्यात दिल्लीत मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे मोठे अधिवेशन घेणार आहे. त्यासाठी पक्षातर्फे दिल्लीत 3 लाख अल्पसंख्याकांची परिषद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याक परिषदेला संबोधित करण्याची योजना आहे.