भाजपा उमेदवारांची पहिली यादी उद्या? नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्या नावाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 05:21 PM2019-03-15T17:21:47+5:302019-03-15T17:33:14+5:30
भारतीय जनता पार्टी (भाजपा) सुद्धा शनिवारी (दि. 16) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच, अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) सुद्धा शनिवारी (दि. 16) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असू शकते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवली होती.
उद्या संध्याकाळी साडे चार वाजता भाजपाची बैठक होणार आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक आयोग समितीच्या या बैठकीत नरेंद्र मोदी असणार आहेत. या बैठकीनंतर भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाच्या या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, सदानंद गौडा, राधामोहन सिंह यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या 11 एप्रिलला लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 91 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रचाराची रणनीती आखून, काही पक्ष रणांगणात उतरलेही आहेत.भाजपानेही प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीकडून आपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे.