'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 06:38 PM2024-09-23T18:38:02+5:302024-09-23T18:38:14+5:30
BJP membership campaign : या अभियानांतर्गत कोणाला पक्षाचे सदस्य व्हायचे असेल तर तो घरी बसून ऑनलाइन पद्धतीने सदस्य होऊ शकतो.
BJP membership campaign : नवी दिल्ली : २५ सप्टेंबर रोजी भाजप सदस्यत्व अभियान राबवणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील एक कोटी लोकांना जोडण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. २५ सप्टेंबरला पक्ष केंद्र, राज्य, जिल्हा, विभाग ते बूथ स्तरापर्यंत सदस्यत्व अभियानाची विशेष मोहीम राबवणार आहे. दरम्यान, हा दिवस भाजपचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिवस आहे.
भाजपने देशभरात मेगा सदस्यत्व अभियान सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचे पहिले सदस्य बनून सुरुवात केली. भाजपच्या या प्रचारात अधिकाधिक लोक सहभागी होत आहेत. या अभियानांतर्गत देशभरातून जो कोणी भाजपचा सदस्य होईल, त्याची संपूर्ण कुंडली पक्षाकडे असणार आहे.
दरम्यान, या अभियानांतर्गत प्रत्येक राज्याला सदस्य बनवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. या अभियानात एआयचाही वापर केला जात आहे, जेणेकरून एकाच व्यक्तीला दोनदा पक्षाचे सदस्य होण्यापासून रोखता येईल. तसेच, या अभियानांतर्गत कोणाला पक्षाचे सदस्य व्हायचे असेल तर तो घरी बसून ऑनलाइन पद्धतीने सदस्य होऊ शकतो.
कसे बनतील सदस्य?
भाजपची ही सदस्यत्व मोहीम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत मिस्ड कॉल, नमो ॲप, वेबसाइट आणि क्यूआर कोड स्कॅन करून कोणतीही व्यक्ती सदस्य होऊ शकते. भाजपात कोणतीही व्यक्ती केवळ सहा वर्षे पक्षाचा सदस्य राहू शकते. सहा वर्षानंतर पुन्हा सभासदत्व घ्यावे लागते. भाजप दर पाच वर्षांनी सदस्यत्व अभियान राबवते.
यावेळी भाजपने १० कोटी नवीन सदस्य बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे अभियान ५१ दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे पक्षाला ५१ दिवसांत सर्व कामे पूर्ण करायची आहेत. पक्षाने २०१४ मध्ये सदस्यत्व मोहीम सुरू केली तेव्हा ११ कोटींहून अधिक सदस्य जोडले गेले आणि हे अभियाना जवळपास सहा महिने चालले होते.