Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:53 IST2021-06-04T06:52:43+5:302021-06-04T06:53:57+5:30
योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याचा गौप्यस्फोट

Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : सात महिन्यांनंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये एका मोठ्या बंडाची तयारी होत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार विद्यमान १२६ आमदार भाजपशी फारकत घेऊन दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या बेतात आहेत, असा गौप्यस्फोट योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.
सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे.
परंतु मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. आमदारांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. या बैठकीत फक्त कोरोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली.
बंडाचे निशाण
भाजपचे आ. राकेश राठोड यांनी सरकारविरुद्ध याआधीच बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारच्या लेखी आमदारांना महत्त्वच नाही. कोणी बोलले, तर कायद्याचा बडगा उगारून त्याची बोलती बंद केली जाते. त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन बघता ते भाजपविरुद्ध बंड करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत मिळतात.
फिरोजाबादचे आ. राम गोपाल लोधी यांच्यासह दुसरे आमदारही भाजपविरोधी भूमिका घेत निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत दिसतात.
सूत्रानुसार अशा सर्व आमदारांवर बसपा आणि समाजवादी पार्टी लक्ष ठेवून आहे.