रायबरेलीतील रस्त्यांच्या कामाबद्दल सोनिया गांधींनी दिले गडकरींना धन्यवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:53 AM2018-08-22T11:53:16+5:302018-08-22T11:54:04+5:30
सोनिया गांधी लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 10 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी केंद्रीय भूपृष्ठवहन , रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांना हे पत्र लिहिले आहे.
नवी दिल्ली- दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेमध्ये आल्यावर आपल्या मतदारसंघांमधील विकासकामे थंडावतात असा बुहतांश नेत्यांचा अनुभव असतो. काही नेत्यांना यामध्ये आपल्या भागाला मुद्दाम डावलल्याची शंकाही येते. तसे आरोपही नेते करतात.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघांमधील कामे पूर्ण होण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकारमधील मंत्र्यांना वारंवार पत्रे लिहून पाठपुरावा केला होता. आता मात्र त्यांनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी गडकरी यांना धन्यवाद दिले.
सोनिया गांधी लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 10 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी केंद्रीय भूपृष्ठवहन , रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांना हे पत्र लिहिले आहे. आपल्या भागातील रस्त्यांचा प्रश्न सोनिया गांधी यांनी मांडला होता, त्याला गडकरी यांनी 'सकारात्मक प्रतिसाद' दिल्याबद्दल सोनिया यांनी आभार मानले आहेत. मार्च महिन्यामध्ये सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 330 ए च्या चौपदरीकरणाबद्दल हे पत्र लिहिले होते. या महामार्गाचा 47 किमी भाग रायबरेली मतदारसंघात येतो. सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 232, 232 ए आणि 330 ए यांचाही चौपदरीकरणाचा विचार करावा असे पत्रात लिहिले होते.
त्यानंतर पाच महिन्यांनंतर 20 जुलौ 2018 रोजी गडकरी यांनी आपल्या विनंतीनुसार तज्ज्ञांद्वारे पाहाणी करुन रायबरेलीतील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या शक्यतेबद्दल कळवले. तसेच सोनिया गांधी यांनी माहिती दिलेल्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण करणे शक्य असल्याचेही त्यांनी पत्रातून कळवले. सोनिया गांधी यांनी याबद्दलच गडकरी यांचे आभार मानले आहेत. सोनिया गांधी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना रायबरेलीमध्ये एक एम्स रुग्णालय स्थापन केले जावे यासाठी पत्र लिहिले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रायबरेलीतील पूरग्रस्त क्षेत्राबाबत पत्र लिहिले होते.