'मोदींच्या रॅलीला न येणारा देशद्रोही' असं म्हणणारा केंद्रीय मंत्रीच रॅलीला गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:26 PM2019-03-04T17:26:45+5:302019-03-04T17:31:05+5:30
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह मोदींच्या रॅलीला अनुपस्थित
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. गिरीराज त्यांच्या विधानांमुळे अनेकदा अडचणीतही सापडले आहेत. मात्र आता त्यांच्यासमोर एक वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बिहारमध्ये होते. तिथे त्यांनी पाटण्यात एका रॅलीली संबोधित केलं. या रॅलीच्या आधी गिरीराज यांनी केलेलं विधान चर्चेत होतं. मोदींच्या रॅलीला न येणारे देशद्रोही असतील, असं गिरीराज म्हणाले होते. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. मात्र गिरीराज सिंह स्वत:च मोदींच्या रॅलीला न गेल्यानं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.
काल पाटण्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. या सभेला गिरीराज सिंह अनुपस्थित होते. त्यांनी याबद्दलची माहिती ट्विटरवरुन दिली. यानंतर गिरीराज सिंह सोशल मीडियावर ट्रोल झाले. गिरीराज यांचं आधीचं विधान आणि त्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं. तीन मार्चला होणाऱ्या पाटण्याच्या गांधी मैदानात होत असलेल्या मोदींच्या सभेला जो अनुपस्थित राहील, तो देशद्रोही असेल, असं गिरीराज काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यापुढे जाऊन रॅलीतील उपस्थितीवरुन कोण हिंदुस्तानासोबत आहे आणि कोण पाकिस्तानसोबत आहे हे स्पष्ट होईल, असंदेखील गिरीराज यांनी म्हटलं होतं.
2 दिन पहले नवादा से पटना आने के क्रम में अस्वस्थ हो गया,इस कारण मा० @narendramodi जी के संकल्प रैली में शामिल न हो सका।
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) March 3, 2019
विशाल रैली और प्रधानमंत्री जी के सम्बोधन को TV पर देखा।
देश के विकास के लिए और दुश्मनों के मंसूबो को तोड़ने के लिए जनता पुनः नमो को प्रधानमंत्री बनाएगी।
जे हिंदुस्तानासोबत आहेत, ते मोदींच्या रॅलीला उपस्थित राहतील आणि जे पाकिस्तानच्या बाजूनं आहेत, ते मोदींच्या रॅलीला अनुपस्थित राहतील, असं गिरीराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानाबद्दल संयुक्त जनता दलानं आक्षेप नोंदवला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानं भाजपावर निशाणा साधला होता. मात्र मोदींच्या रॅलीतील अनुपस्थितीवरुन देशद्रोही ठरवणारे गिरिराज सिंह स्वत:च रॅलीला हजर नसल्यानं याची मोठी चर्चा झाली. प्रकृती अस्वस्थ असल्यानं मोदींच्या रॅलीला जात नसल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली.