होळी-दिवाळीला DJ बंद करता मग मशिदीवरील भोंगे का उतरवायचे नाहीत?; भाजपा मंत्र्याचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:05 PM2022-04-08T15:05:01+5:302022-04-08T15:06:11+5:30
मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेते आणि बिहार सरकारमधील खाणकाम मंत्री जनक राम यांनी या मुद्द्यावर भाष्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
मुझफ्फरपुर-
मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेते आणि बिहार सरकारमधील खाणकाम मंत्री जनक राम यांनी या मुद्द्यावर भाष्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मशिदीत लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घातली पाहिजे. ही जनभावना असून, लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या मनाची गोष्ट मी बोलून दाखवत आहे, असं जनक राम म्हणाले.
"होळी, दिवाळी आणि छठ हे महत्वाचे सण मानले जातात. यामध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजला की तो बंद केला जातो. मग मशिदीत मोठ्याने लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी का घालू नये. मला हे थांबवायला आवडेल. राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करून तुम्ही एखाद्या वर्गावर बंदी घालता तेव्हा मशिदीवरही बंदी घातली पाहिजे", असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना होतो त्रास
मशिदींवरील भोंगे उतरवले जावेत ही जनतेची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जेव्हा मशिदीत मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवला जातो, तेव्हा जवळपास शिकणाऱ्या मुलांची अडचण होते. तिथे राहणारे लोक, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्या समस्या आहेत. जनतेचा आवाज दाबला गेली की जनताच आवाज उठवते. लोकप्रतिनिधी आणि मंत्री या नात्याने आम्ही हा मुद्दा ठेवला आहे. प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मावर बंदी असताना त्यावरही बंदी घातली पाहिजे, असं जनक राम म्हणाले.
विधानसभेत यासंदर्भात कुणी सवाल उपस्थित केला तर आम्ही त्यास उत्तर देण्याचे काम करू असंही ते म्हणाले. राज्यातील मशिदीत लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा वेळोवेळी गाजत असतो. त्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. मंत्र्याच्या या विधानाने पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात खळबळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.