भाजपचे २०२४चे एकच मिशन; प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मते, लोकसभेची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 05:13 AM2023-12-24T05:13:49+5:302023-12-24T05:14:24+5:30

अयोध्येतील सोहळ्याशी प्रत्येकाला जोडून घेणार.

bjp mission for 2024 and 51 percent votes in each constituency preparation for lok sabha begins | भाजपचे २०२४चे एकच मिशन; प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मते, लोकसभेची तयारी सुरू

भाजपचे २०२४चे एकच मिशन; प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मते, लोकसभेची तयारी सुरू

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा मंत्र देताना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असेही त्यांनी म्हटले. 

नवी दिल्लीत शनिवारपासून सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय पदाधिकारी व प्रदेश नेत्यांच्या बैठकीचा आज अखेरचा दिवस होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावेळी संबोधित केले. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भाजपच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता लक्ष्य समोर ठेवून मिशन मोडवर काम करावे लागेल. सर्व लोकसभा जागांवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे लागेल.

५०० वर्षांनंतरच्या संघर्षानंतरचा कार्यक्रम 

शनिवारी सुमारे ६ तास चाललेली बैठक सकाळी १० वाजता सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप नेत्यांना सांगितले की, २०२४ चा विजय एवढा मोठा व ऐतिहासिक असला पाहिजे की, विरोधकांनी आम्हाला आव्हान देण्यापूर्वी १० वेळा विचार केला पाहिजे. या विजयासाठी सर्वांना युद्धपातळीवर काम करावे लागेल. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नेता, कार्यकर्त्याला सहभागी करून घेतले पाहिजे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी यावेळी संबोधित केले. त्यांनी या कार्यक्रमाशी संबंधित कार्यक्रमात देशभरातील लोकांना जोडण्याचे आवाहन केले. श्रीराम मंदिर आंदोलन भाजपने हाती घेतलेले मोठे आंदोलन आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. 

महाराष्ट्रात मोठा विजय मिळविण्याचा दावा

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी राज्यनिहाय लोकसभा जागांची स्थिती व जिंकण्याच्या शक्यता, यावर चर्चा झाली. सर्व भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील मतदारसंघांचा आढावा सादर केला. संभाव्य युती करण्यासाठी सहयोगी पक्षांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळण्याचा दावा करण्यात आला. 

१६० उमेदवारांची जानेवारीत घोषणा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागा जिंकण्याची तयारी भाजपने मागील पाच वर्षांपासून सुरू केली होती. त्या जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजप पुढील महिन्यात २२ जानेवारीनंतर कधीही करू शकतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्येही लवकर उमेदवारांची घोषणा केल्याचा भाजपला फायदा मिळाला होता.

 

Web Title: bjp mission for 2024 and 51 percent votes in each constituency preparation for lok sabha begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.