उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:24 AM2018-04-14T02:24:34+5:302018-04-14T02:24:34+5:30
भाजपाचा आमदार कुलदीप सेनगर याला उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी पहाटे सीबीआयने ताब्यात घेतले. पहाटे साडे चार वाजता त्याच्या घरी सीबीआयचे अधिकारी गेले आणि त्याला ताब्यात घेतले, तेव्हा घरातील मंडळीनी प्रचंड गोंधळ घातला.
लखनऊ : भाजपाचा आमदार कुलदीप सेनगर याला उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी पहाटे सीबीआयने ताब्यात घेतले. पहाटे साडे चार वाजता त्याच्या घरी सीबीआयचे अधिकारी गेले आणि त्याला ताब्यात घेतले, तेव्हा घरातील मंडळीनी प्रचंड गोंधळ घातला. या बलात्कार प्रकरणाचा तपास कालच सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र अटक केली नव्हती. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमदार सेनगरला ताबडतोब अटक करा, असे आदेश दिले.
आ. सेनगर याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अपहरण व तिच्या वडिलांच्या मारहाणीचा कट याबद्दलची कलमे लावून एफआयआर दाखल करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आ. सेनगरला अटक करण्यास मात्र टाळाटाळ चालवली होती. त्याला ताब्यात घेतल्याबद्दल बलात्कार झालेली मुलगी व तिच्या आईने समाधान व्यक्त करतानाच, त्याला अतिशय कडक शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय तपास व आ. सेनगरला ताब्यात घेतल्याचे सारे श्रेय आपल्या सरकारचे असल्याचा दावा केला आहे. व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यावर कायद्यानुसारच कारवाई होईल, असे ते म्हणाले.
आ. सेनगर व त्याच्या भावाने जून २०१७मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. तपास योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल तिने ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी त्या मुलीचे वडील पप्पू सिंग यांना अटक केली. दुसºया दिवशी वडिलांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. सिंग यांना पोलीस कोठडीमध्ये आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम अहवालात त्यांना झालेल्या मारहाणीचा उल्लेख होता. तसेच त्यांनीही मृत्यूआधी आपणास कोणी मारहाण केली, हे सांगितले होते. (वृत्तसंस्था)
>तपासाचा अहवाल द्या
आमदाराला ताब्यात घेतले आहे, पण अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात देताच मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले व न्या. सुनीत कुमार यांच्या खंडपीठाने सीबीआयला अटकेचे आदेश दिले.
या प्रकरणातील तपासाची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.