संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:11 AM2024-05-28T09:11:17+5:302024-05-28T09:12:15+5:30
भाजपा आमदाराने आपल्यास सरकारच्या काळात बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दर्जावर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी विभागीय अधिकाऱ्यावर गैरव्यवहाराचा आरोपही केला आहे.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील भाजपा आमदाराने आपल्यास सरकारच्या काळात बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दर्जावर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी विभागीय अधिकाऱ्यावर गैरव्यवहाराचा आरोपही केला आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर रस्त्याच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी आमदार आले होते. तपासादरम्यान त्यांनी आपल्या पेनाने चक्क रस्ता खोदला. रस्त्यातील त्रुटी दाखवून भाजपा आमदार संतप्त झाले.
आमदारांनी ठेकेदार आणि जेई यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. आमदाराच्या धमकीनंतर पीडब्ल्यूडी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लखीमपूर जिल्ह्यासह तहसील पुवायनला जोडणाऱ्या सुमारे 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुवायन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे. हा रस्ता 32 कोटींच्या बजेटमध्ये बांधण्यात येणार आहे. स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून रविवारी भाजपाचे आमदार चेतराम अचानक रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी आपल्या पेनानेच नव्याने बांधलेला रस्ता खोदला.
रस्तेबांधणीच्या गुणवत्तेतील त्रुटी पाहून भाजपा आमदार संतप्त झाले आणि त्यांनी ठेकेदार आणि जेई यांना खडसावलं. बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार चेतराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याचे काम दर्जेदार होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून आली होती. पुढचा रस्ता तयार होत असताना, मागचा रस्ता आपोआपच उखडतो, खराब होतो.
योगी सरकार रस्ते बांधणीत गुणवत्तेच्या बाबतीत झिरो टॉलरेन्स धोरणावर काम करत आहे. रस्त्याच्या दर्जाशी अजिबात तडजोड केली जाणार नाही. त्याचबरोबर जेई आणि ठेकेदार मिळून रस्त्याच्या दर्जाशी खेळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे लोक रस्ता बांधतील आणि निघून जातील. आम्ही या रस्त्यावरून चालत राहू. मात्र हा रस्ता आपोआपच खचत चालला आहे असं म्हटलं आहे.